सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२०

वादक

प्रिय
वादक बांधव, 
रा. पुणे शहर

पत्र लिहण्यास कारण की, 

तुमच्या मनाची अवस्था आज आम्ही समजतोय. आज जर करोना नी ताणले  नसतं तर .......ढोल ताशे ताणुन तुम्ही दरवर्षी प्रमाणे डोळ्याचे पारणे फेडणारा ,तुफान, बेधुंद ,तल्लीन होऊन जो ईतिहास घडवता असता त्याला कुठलाही शब्द हा डिक्शनरी मध्ये सापडणार नाही.

खास करुन पांढरा, केशरी आणि विविध रंगाचा पेहराव पाहिल्यावर फक्त सुंदर हा शब्द तोंडात आपल्याला पाहिल्यावर येणारच. आपल्या ढोल ताशा वाजवणारे भगिनींचा साज तर अप्रतिम.

वर्षभर ज्या वेळेची तुम्ही आवर्जून वाट पाहाता तो क्षण म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दिवशीचे वादन. लक्ष्मी रोड ला वाजवायला मिळणे म्हणजे हे तर प्रत्येक वाचकचे स्वप्न. बेलबाग आणि अलका चौकात वाजवायला मिळणे म्हणजे तर म्हणजे विषय खोल. 

आदल्या दिवशी अनंत चतुर्दशी श्री तयारी तर लगीनघरासारखे असते.

पण या वर्षी तुम्ही वादक बांधवांनी आणि सगळे गणेशभक्तांनी जेवढा संयम दाखवून सरकारला सहाय्य केले आहे. त्या  संयमाला मनापासून मानाचा मुजरा.

वादक बांधव भगिनींनो सलाम तुमच्या तपश्चर्येला आणि तुमच्या संयमी भावनांना..... 

तुमचा आणि तुमच्या कलेचा 
एक निस्सीम चाहता.


कळावे, 

प्रेषक
एक वादन भक्त पुणेकर

पुण्याची गणपती मिरवणूक



आज अनंत चतुर्दशी..... ज्या प्रमाणे एक लगीन घर  सजवले जाते त्याचप्रमाणे आज पुणे शहराला प्रत्येक अनंत चतुर्दशीला सजवलं जायचे.... 
रस्त्यांवर हे भल्या मोठ्या रांगोळ्या..... गुलालाची उधळण......  ढोलाचा पहिला ठोका आणि ताशाची तर्री गाजवणारा आणि वाजवणारा बेफान झालेला वादक आणि ढोलताशा पथक..... मिरवणुकीतील  आकर्षक चित्ररथ..... मंडईच्या लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यापासून ते अलका टॉकीज चौका पर्यंत चा माहोल म्हणजे एक प्रकारचे स्वर्गसुखच...

 पुणेकरांनी मिस तरी किती गोष्टी करायच्या...... 

 हिराबाग ,खजिना विहिर निंबाळकर तालीम आणि हत्ती गणपती चे हलते देखावे नाहीत ना नातुबाग ची लायटिंग. बाबु गेनू  मंडई आणि दगडूशेठ गणपती च्या कलाकृती नाहीत. सगळयात महत्त्वाचे म्हणजे मिरवणूका नाही ना अलोट गर्दी. रात्री 12 पर्यंत  टॅक्टर वर ऊभे राहून उभे राहून बेफाम नाचणारी तरुणाई नाही.केवळ आणि केवळ शांतता.... आणि  मनातल्या मनात केवळ ओक्साबोक्षी रडत असलेले गणेश भक्त. .... पुणे शहरामधली गणपती मिरवणूक आणि पंढरीची वारी मिस करणे म्हणजे या वर्षीचे सर्वात मोठे दुःखद क्षण.

देवा गणपती बाप्पा तुच धाव रे तुझ्या लेकरांच्या मदतीला..... तुच आमचा पालनहार आणि तुच आमचा आरोग्यदाता.... तुच आमचा पिता...... आणि तुच आमची माता..... 

या वर्षी आम्ही पुणेकरांनी जेवढे साधेपणाने उत्सव साजरा केला आहे त्याच्या उलट पुढच्या वर्षी भव्य दिव्य ना भुतो ना भविष्यतो ऊत्सव नक्कीच साजरा करु.... 

मनात बाप्पा
मुखात बाप्पा
विचारात बाप्पा
कार्यात बाप्पा
जमिनीवरील एका  मातीच्या कणापासून आकाशातुन येणाऱ्या पावसाच्या एका थेंबात असणारा सर्व व्यापी आपला बाप्पा.... 

बाप्पा आपला...... 
आणि 
आपण बाप्पाचे

या वर्षी बाप्पा माफ कर कारण या वर्षी घेतला आहे ब्रेक......  आम्ही पुणेकरांनी....

पण पुढच्या वर्षी तुझे भक्त ऊत्सव करणार रेकॉर्ड ब्रेक ......❤️

लेखक - अॅड गिरीश उज्वला मधुकरराव भोसले

रविवार, ३० ऑगस्ट, २०२०

श्रीमंत❤

प्रति. 
 दगडूशेठ हलवाई गणपती
मंडळ (ट्रस्ट) 
पत्त्याची गरज नाही, 
फक्त नावच पुरेसे आहे. 

पत्र लिहण्यास कारण की, 

शिवाजी रोड वरुन जरी मंदिरासमोरुन गेलो ना तरी  बस च्या खिडकीतुन एक सेकंदासाठी का होईना, आपल्या मुर्ती चे दर्शन होणे म्हणजे  स्वर्गसुखच..... 

मंडळासमोरची  गणेशोत्सवासोबत ईतर वेळी दररोज होणारी गर्दी सांगुन जाते कि भाविकांसाठी आपले मंडळ (ट्रस्ट) हे एक प्रकारचे तीर्थक्षेत्र च आहे. गणेशोत्सव काळात सुध्दा रात्री 2 वाजता पण हजारो च्या संख्येने भाविक नतमस्तक होण्यासाठी येतात तर दिवासाची गिनती न केलेली बरी. सव्वा कोटी पेक्षा जास्त भाविकांनी करोनाच्या काळात आपल्या मुर्ती चे आॅनलाईन दर्शन घेतले आहे यातच सर्व काही येतं. 

आपल्या मंडळाचे सामाजिक उपक्रमाची यादी न संपण्यासारखी आणि प्रत्येक सामाजिक क्षेत्रात भरगोस मदत करणारी आहे. काही जागा ठराविक गोष्टींमुळे ओळखले जातात पण  दगडूशेठ हलवाई गणपती मुळेच आपले शहर ओळखले जाते असे आम्हा गणेशभक्तांना आवर्जून वाटते. मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे समाजातील गरजु लोकांना मदत करणे. मदत करताना कुठलाही गाजावाजा न करता   अन्नदान, आरोग्य शिबिरे ही गरजु विद्यार्थी मित्रांसाठी शैक्षणिक आणि दत्तक उपक्रम, यातच मंडळाची समाजाप्रती असलेली आस्था आणि तळमळ दिसून येते.फक्त पुणे शहरापुरते मर्यादित न राहता भारतात जिथे जमेल तिथं गरजु लोकांची  मदत गणपती बाप्पाच आपल्या ट्रस्ट च्या माध्यमातून करतो असे  सगळ्या गणेशभक्तांना  जाणवते. 
दगडूशेठ हलवाई गणपती ची मिरवणूक आणि डेकोरेशन पाहायला मिळणे म्हणजे स्वर्गसुखाचा अनुभव. 
 या वर्षी आम्ही सर्व जण हे मिस करु..... 
पण पुढच्या वर्षी न भुतो ना भविष्यातो असा डोळे दिपवणारा गणेशोत्सव साजरा करू.

एक गणेशभक्त

 संकल्पना आणि विशेष सहकार्य - कमलेश भांडे, प्रेम कांबळे,  आशिष सावंत रविकांत कांबळे आकाश इंगवले

लेखक
गिरीश भोसले


टिप्पणी - मंडळाचा ईतिहास आणि कार्य इतकं जबरदस्त आणि ईतक्या मोठ्या प्रमाणात आहे की तो लिहणे माझ्या(लेखकाच्या) आवाक्याबाहेर असल्याने भाविकांच्या नजरेमधुन आपल्या मंडळासाठी सदर पत्र लिहिले आहे.

नवसाचा गणपती ❤

नवसाचा गणपती


प्रति, 
हुतात्मा बाबू गेनू मंडळ, 
लोकमान्य टिळक पुतळा 
समोर, मंडई पुणे 2

पत्र लिहण्यास कारण की, 

पुणे शहरात अशी ठराविक मंडळ आहेत की ज्या मंडळांनी पुण्याचे गणेशोत्सवाचं नाव देशभर तसेच साता समुद्राच्या पलीकडे पोहचवुन आपल्या पुण्यनगरी च्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.... यातील महत्त्वाचे आघाडीवर असलेले मंडळ म्हणजे हुतात्मा बाबू गेनू मंडळ. 

आपल्या मंडळाला नवसाचा गणपती हे नाव कसे पडले हे खुप थोडे जणांना माहीत आहे. साधारणपणे 50 वर्षापूर्वी ची गोष्ट असेल. मंडळाचे स्थापनेच्या प्रारंभी ची दोन वर्षे नवीन मुर्ती स्थापन करण्यात येत , 1973 साली मंडळासाठी कायमस्वरूपाची मुर्ती करण्याचे ठरले. मुर्ती कार अनंतराव वाईकरांकडुन आपल्या मंडळाची मुर्ती तयार होत असताना वाईकर काकांचे निधन झाले. केवळ धडा पर्यन्त तयार झालेली मुर्ती पाहुन आपल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बाप्पा लाच मुर्ती साकारण्यासाठी नवस केला आणि मुर्तीकार प्रकाश गोसावी काकांनी मुर्ती काही दिवसांतच पुर्णत्वास आणली. तेव्हापासून आपल्या बाप्पा ला नवसाचा गणपती अशी ओळख मिळाली. कोणत्याही अंधश्रद्धेला मंडळ कधीच पाठिंबा देत नाही हे मंडळाचे कार्यकर्ते आवर्जून सांगतात. 

मंडळाचे देखावा म्हणताल तर एकच गाणे डोळ्यासमोर येत...... ते म्हणजे नाद करा..... पण आमचा कुठं...... 

सुंदर..... शानदार...... जबरदस्त हे तिन्ही विशेषणे कमी पडतील ईतकी अप्रतिम आपल्या मंडळाची कलाकृती असते. नितीन चंद्रकांत देसाई आणि हुतात्मा बाबु गेनू मंडळ हे समीकरण रेल्वे आणि रुळ यांच्यासारखे एकमेकांना घट्ट चिकटून राहिलेलं. काही वर्षांपुर्वी देवदास मधील चंद्रमुखी च्या महालापासुन मागील वर्षी केलेला शनिवारवाडा च्या मंडळाच्या कलाकृती ता तोड शक्य नाही.....हलता देखावा करावा तर हिराबाग मित्र मंडळाने आणि गणेशोत्सवात कलाकृती करावी हुतात्मा बाबु गेनू मंडळाने ही प्रत्येक पुणेकराची मनातील भावना आहे. 

या वर्षी करोना संसर्गामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा होत असला तरी लवकरच हुतात्मा बाबु गेनू मंडळाचा नवसाचा गणपती च्या आशिर्वादाने भारता सोबत जगावरील करोना चे संकट लवकरच हटले जावो ही श्रीं चरणी प्रार्थना व्यक्त करतो आणि आपल्या मंडळाला या वर्षी 50 वर्ष पूर्ण झाले बद्दल पुणे शहरातील नागरीकांच्या वतीने शुभेच्छा देतो. 

धन्यवाद

कळावे. 

प्रेषक
आपल्या मंडळाच्या 
कलाकृती चा चाहता
एक पुणेकर


प्रति, 
हुतात्मा बाबू गेनू मंडळ, 
लोकमान्य टिळक पुतळा 
समोर, मंडई, पुणे 2


पुणे शहरातील ज्या मंडळांनी देखावे आणि डेकोरेशन ची ख्याती साता समुद्राच्या पलीकडे नेऊन महाराष्ट्रातील गणेशभक्तांना पुण्यात येऊन देखावे आणि डेकोरेशन पहायला आनंदाने भाग पाडले त्या मंडळांसाठी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी.

विशेष सहाय्य
आकाश इंगवले, प्रेम कांबळे, आणि कमलेश भांडे. 
अॅड. आशिष सावंत, अॅड रविकांत कांबळे


लेखन
 अॅड.गिरीश भोसले

शनिवार, २९ ऑगस्ट, २०२०

शारदा गजानन आणि लक्ष्मी नारायण मुर्तीची आठवण करून देणारा अनोखा संगम

प्रति, 
अखिल मंडई मंडळ, 
शुक्रवार पेठ पुणे 2

पत्र लिहण्यास कारण की, 

लिहिल तितके कमी आणि बोलेल तितके अपुरे हे विशेषण ज्या मंडळाला आणि त्याच्या ईतिहासाला लागु पडते असे आपले भाविकांचे श्रध्दास्थान असलेले  अखिल मंडई मंडळ. 
मुर्ती च्या स्थापनेपासून ते आजपर्यंत..... मंडळाच्या देखाव्यापासुन ते मिरवणुकीच्या रथापर्यंत.......आपल्या पुणे शहराची आन बाण शान आणि  गणेशभक्ताची जान असलेलं एकमेव, अद्वितीय असलेले आणि ज्या मुर्ती ची एक झलक पाहिल्यावर मन प्रसन्न होते असे आपलं अखिल मंडई मंडळ . हे केवळ मंडळ किंवा ट्रस्ट नाही तर प्रत्येक पुणेकर नागरिकांच्या मनातलं एक तीर्थ क्षेत्र च म्हणावे लागेल. 
आपल्या मंडळाचा मुर्ती चा ईतिहास तर ऐकण्याजोगा, वाचण्याजोगा आणि पाहण्याजोगा तर आहेच परंतु मंडळाचीमुर्ती स्वातंत्र्यापासुन ते पुणे शहराच्या आजपर्यंतच्या ईतिहासाची साक्षीदार आहे. मुर्ती ची खासीयत म्हणजे मुर्ती ही 7 नद्यांच्या पाण्यापासून तसेच कागद, लगदा आणि  गवता पासुन तयार केली गेली आहे. याचे संपुर्ण श्रेय आदरणीय कै. लक्ष्मणराव डोंगरे काची यांना जाते. 1893 साली त्यांनी सदर ची मुर्ती घडवली आणि त्या वेळी आपल्या पुणेकरांना आपली शारदा गजानन बाप्पा ची मुर्ती मिळाली....लक्ष्मी नारायणाची आठवण करून देणारी आपली शारदा गजाननाची  मुर्ती म्हणजे एक अलौकिक संगमच

एकी हेच बळ हे ब्रीदवाक्य असलेले आपले मंडळ दरवर्षी कुठलाही गाजावाजा अथवा जाहिरात बाजी न करता गरजु विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेणे, यांच्यासारखे मोठे शेकडो उपक्रम वर्षभर राबवत असते. मंडळाचा देखाव्या सोबत मंडळाचा मिरवणूक रथ पहायला होणारी गर्दी च सांगुन जाते की शान असावी तर मंडईच्या गणपती सारखी. 

मंडळानी या वर्षी करोना रोगाचा प्रादुर्भावामुळे पुणे महानगर पालिकेच्या सोबत महामारी च्या विरोधात केलेले कार्य हे कौतुकास्पद आहे. म्हणूनच आम्हा पुणेकरांना आपले मंडळाचे आणि कार्यकर्त्यांचे केवळ कौतुक नाही तर सार्थ अभिमान आहे. मंडळाचा ईतिहास आणि समाज कार्य एका लेखात कदापिही संपणार नाही एवढे मंडळाचे कार्य आहे. 

अडचणी च्या काळात सामान्य माणसाच्या मदतीला धावून जाणाऱ्या आपल्या मंडळास आणि मंडळाच्या ज्येष्ठ आणि तरुण कार्यकर्ते बांधवांना मानाचा मुजरा.

प्रेषक
एक गणेशभक्त
जो मंडळाच्या मुर्ती चा भक्त आहेच
आणि मंडळाच्या सामाजिक कार्याचा पण हितचिंतक आहे. 


प्रति, 
अखिल मंडई मंडळ, 
शुक्रवार पेठ पुणे 2


माहिती संकलन आणि विशेष सहकार्य 
अॅड. रविकांत कांबळे, अॅड. आशिष सावंत, आकाश इंगवले, प्रेम कांबळे, कमलेश भांडे

लेखक अॅड गिरीश उज्वला  मधुकरराव भोसले

आपली खजिना विहिर

प्रति, 
खजिना विहिर तरुण मंडळ
टिळक रोड, सदाशिव पेठ
पुणे 30

काही ठिकाणांना पत्त्याची गरज नसते उलट तोच पत्ता त्या विशिष्ट ठिकाणामुळे ओळखला जातो, हे शब्द ज्या मंडळाला एकदम परफेक्ट शोभून दिसते, असे पुण्यातील तरुणाईच हक्काच एकमेव ठिकाण म्हणजे खजिना विहीर तरुण मंडळ.

टिळक रोड वर एस पी काॅलेजपासुन हाकेच्या अंतरावर असलेले खजिना विहिर तरुण मंडळ म्हणजे पुणे शहरातील हलते देखाव्यांमध्ये टाॅप 5 मध्ये येणार नाव. 
आपल्या मंडळाने हलत्या देखावे सोबत भव्य दिव्य देखावे सादर करण्याची परंपरा वर्षानुवर्षे जपली आहे. गणेशोत्सवा सोबत दहीहंडी सुध्दा सुंदर पध्दतीने साजर करणारे आपले मंडळात तरुण हक्काने नाचण्यासाठी येतात. 
सगळ्यात महत्त्वाचे मधला म्हणजे आपला मिरवणुकीतील चित्ररथ. अत्यंत सुंदर पध्दतीने आणि दरवर्षी नवनवीन कलाकृती मिरवणूकीच्या रथातून मांडणारे आणि कौतुक करावे असे आपले मंडळ आहे. 
मंडळाने काही वर्षांपूर्वी नरसिंह अवतार देखावा अत्यंत सुंदर पध्दतीने सादर केला होता. पौराणिक देखावे सोबत आपले मंडळ सामाजिक भान जपत वर्षभर सामाजिक उपक्रम राबवण्यात अग्रेसर असते.
आपल्या मंडळाचा ईतिहास हा अगदी कमी लोकांना माहीत असेल. पुणे शहरात ज्या ज्या वेळी दुष्काळ पडला त्या त्या वेळी आपल्या खजिना विहीरीने पुणे शहराला पाणीपुरवठा केला. ऐतिहासिक असलेल्या या विहिरीला यावरूनच खजिना विहिर नाव पडले. अडचणीच्या काळात समस्त पुणे शहरातील नागरिकांना जीवन देणारी आणि अडचणी ला धावुन जाणारी खजिना विहिरचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच मंडळानी आणि मंडळाचे कार्यकर्ते बांधवांनी समाज उपयोगी कार्य अविरतपणे चालू ठेवले आहे. या महामारी च्या काळात मंडळातर्फे सॅनिटाइजर आणि मास्क चे वाटप तसेच देवदासी महिलांना अन्नदान करण्यात आले. दरवर्षी डोळे दिपवणारा दहीहंडी आणि गणेशोत्सव साजरा करणारे आपल्या मंडळाने या वर्षी सामाजिक उत्सव ही संकल्पना प्रत्यक्षात आणुन समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. 


भव्य ऊत्सवासोबत सामाजिक संदेश देणारे आपल्या मंडळाला आणि मंडळाच्या जनसेवक कार्यकर्ते बांधवांना आपल्या कार्यासाठी मानाचा मुजरा.

प्रेषक
आपल्या मंडळाच्या 
दहीहंडी ऊत्सवाला
दरवर्षी हजेरी लावणारा
मनसोक्त नाचणारा तरुण


प्रति, 
खजिना विहिर तरुण मंडळ
टिळक रोड, सदाशिव पेठ
पुणे 30

संकल्पना
कमलेश भांडे आणि आकाश इंगवले

विशेष सहकार्य
आशिष सावंत, रविकांत कांबळे प्रेम कांबळे

लेखक
गिरीश भोसले

शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२०

एकात्मतेचे प्रतिक

प्रति, 
वडार सामाजिक सार्वजनिक
गणेशोत्सव मंडळ, वडारवाडी, 
शिवाजी नगर पुणे 16

पत्र लिहण्यास कारण की, 

आपल्या पुणे शहरात असा एक पण तरुण सापडणार नाही की तो कुठल्याही गणपती मंडळाचा कार्यकर्ता नाही. 
 लहान तरुण आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यंचा भरणा असलेले वडार सामाजिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, वडारवाडी, शिवाजी नगर पुणे 16 याचे एक उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. मंडळाला नाव जरी एका विशिष्ट समाजाचे असले तरी मंडळाचे कार्यकर्ते, सभासद आणि सल्लागार हे केवळ त्या भागापुरते मर्यादित नसून संपुर्ण पुणे शहरातील वेगवेगळ्या समुदायाचे आहेत. आपण सर्व प्रथम भारतीय हा एकात्मतेचा संदेश देणारे आपले मंडळ नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असते. केवळ गणेशोत्सवापुरते मर्यादित न राहता वर्षभर आपले मंडळ सामाजिक आणि देशहिताचे उपक्रम राबवीत असतात. 

आपल्या मंडळाचे एक वैशिष्ट्य म्हणजे रहदारीला अडथळा होणार नाही हा  हेतू डोळे समोर ठेवून मंडळ रस्त्यावर मांडव न टाकता मारुती मंदिराच्या सभामंडपात मुर्ती विराजमान करता. त्या वेळी बुद्धी आणि शक्ती च्या देवतांचे अलोट संगमाचे वातावरण आपलु मंडपात तयार होते. ऊत्सवासोबत समाज कार्य सुध्दा  महत्त्वाचे या हेतूने मंडळ नेहमीच प्रशासनाला संपूर्णपणे सहकार्य करीत आलेले आहे. ज्येष्ठ कार्यकर्ते मंडळीचा सल्ला आणि तरुणांची ईच्छाशक्ती च्या जोरावर मंडळाने आतापर्यंत सुंदर उपक्रम राबवले आहेत. आपले मंडळ देखावा डेकोरेशन करीत नाही पण डोळे दिपले जातील आसा मिरवणूक गाजवणारा रथ आपल्या मंडळाचा असतो. 
1933 साली स्थापन झालेल्या आपल्या मंडळाचे यंदा 87 वे वर्ष असुन मंडळ या वर्षी चा उत्सव सरकारने आखुन दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करून साजरा करीत आहे. येत्या काही वर्षात मंडळ आपले शतक पूर्ण करुन आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवेल यात तिळमात्र शंका नाही. 

एकात्मतेचा संदेश देणारे आपल्या वडार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला आणि मंडळाच्या सर्व कार्यकर्ते बांधवांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.


आपल्या मंडळाचा
हितचिंतक एक पुणेकर


प्रति, 
वडार सामाजिक सार्वजनिक
गणेशोत्सव मंडळ, वडारवाडी, 
शिवाजी नगर पुणे 16

 माहिती संकलन आणि संकल्पना
भागवत सुभाष पवार

लेखक
गिरीश भोसले

ऐतिहासिक श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती


प्रति
 श्रीमंत भाऊसाहेब
रंगारी गणपती ट्रस्ट,
662,657 भाऊ रंगारी रोड, 
शनिवार वाड्याच्या मागे, 
बुधवार पेठ पुणे 02


पत्राच्या सुरवातीला आदरणीय देशभक्त भाऊसाहेब रंगारी यांना मनापासून वंदन

पत्र लिहण्यास कारण, 

तासनतास जरी पहात राहिले तरी मन भरत नाही अशी आपल्या मंडळाची (ट्रस्ट ची) मुर्ती....जिचे सौंदर्य सूर्यासारखे तेजस्वी आणि प्रखर आहे. साधारणपणे 128 वर्ष उलटल्यानंतर ही ज्या मुर्ती ची सुंदर ता ईविलिशी सुध्दा कमी झाले नाही याऊलट दिवसें दिवस सुंदर होत असणारी मुर्ती पहाणे म्हणजे गणेशभक्तांसाठीची एक सुंदर पर्वणीच. 


आपल्या ट्रस्ट ची मुर्ती भाऊ रंगारी ( मुळ नाव- भाऊसाहेब लक्ष्मण जावळे) यांनी स्थापन केली तेव्हा पासून चा या वर्षी पर्यंत चा आॅनलाईन गणेशोत्सवाचा प्रवास हा अद्वितीय आहे. राज वैद्य असलेले भाऊ रंगारी यांना शालु रंगवण्याच्या व्यवसायावरून रंगारी हे आडनाव पडले. ब्रिटिश राजवटीचा काळ असल्याने देशभक्त असलेल्या भाऊ रंगारी यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहरात 3 गणपती बसविण्यात आले. 
त्यांपैकी पहिला गणपती म्हणजे आपल्या मंडळाचा गणपती. 
लाकुड आणि भुसा वापरुन तयार केलेली आजही 128 वर्षानंतर भाविकांचे आकर्षण ठरत आहे. 
मुर्ती कडे नीट पाहिल्यावर एक बाब प्रकर्षाने जाणवते की ती म्हणजे मुर्ती मधला राक्षस हा दुसरा तिसरा कोणी नसुन अन्याय करणारे ब्रिटिश तर नाही ना?. 
ब्रिटीशांचा नाश करणारी मल्लांच्या आवेशातील गणपती बाप्पा ची मुर्ती ही एक क्रांती कारक वैचारिक भावनेतून तयार केली गेली आहे. असे जुन्या लोकांच्या तोंडुन उल्लेख झाल्यावर भाऊसाहेब रंगारी यांच्या बद्दल चा आदर एक भारतीय नागरिक म्हणून नक्की च वाढला जातो. 

 एक पारंपरिक आदर्श गणेशोत्सव कसा असावा याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे श्रीमंत भाऊ रंगारी गणपती ट्रस्ट. डिजे आणि साऊंड च्या भिंती चा काडीमात्र संबंध न ठेवणारे आपले मंडळ अत्यंत सुंदर आणि वैचारिक आणि सामाजिक पध्दतीने गणेशोत्सव साजरे करताना आपल्याला नेहमी दिसते. उलट नगारखाना आणि सनई मध्ये काय जादु आहे हे आपल्या मिरवणुकीत समजते. 
करोना रोगाचा प्रादुर्भावामुळे आपल्या ट्रस्ट मार्फत आॅनलाईन सांस्कृतिक महोत्सव आणि आॅनलाईन दर्शनाची सोय गणेश भक्तांसाठी केली आहे . आपला हा उपक्रम अत्यंत सुंदर आणि कौतुकास्पद आहे. 

एक आदर्श गणपती उत्सव साजरा करणारे ट्रस्ट म्हणून आम्हाला आमचा कायम अभिमान आहे. आपल्या सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची ऐतिहासिक परंपरा आपल्या ट्रस्ट मार्फत अशीच वृध्दींगत होत राहो अशा सदिच्छा व्यक्त करतो आणि आपली मुर्ती ज्या प्रकारे राक्षसाचा वध करीत आहे त्याचप्रमाणे करोना चा सुध्दा बाप्पा या प्रकारे वध करतील अशी प्रार्थना करतो....... आणि पत्राच्या शेवटी आपल्या ट्रस्ट ला आणि उत्सव जपणारे कार्यकर्ते बांधवांना पारंपरिक गणेशोत्सव जपल्या अभिमानास्पद कारणास्तव मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. 

धन्यवाद

कळावे


प्रति
 श्रीमंत भाऊसाहेब
रंगारी गणपती ट्रस्ट,
662,657 भाऊ रंगारी रोड, 
शनिवार वाड्याच्या मागे, 
बुधवार पेठ पुणे 02

प्रेषक
एक गणेशभक्त



लेखक आणि संकल्पना
गिरीश भोसले

सबसे न्यारा सबसे प्यारा आपला हत्ती गणपती❤🐘

सबसे न्यारा सबसे प्यारा आपला हत्ती गणपती

प्रति, 
अखिल नवी पेठ हत्ती
गणपती मंडळ, छत्रपती
 संभाजी महाराज रोड, 
सदाशिव पेठ पुणे 30.

पत्र लिहण्यास कारण की, 

पुणे शहरात एकमेव गजराजा वर गणपती बाप्पा ची स्वार असलेली तेजस्वी आणि लहान मुलांसोबत मोठ्यांनाही आकर्षित करणारी मुर्ती म्हणजे आपल्या मंडळाची मुर्ती. 
पुणे करांच्या आणि समस्त गणेश भक्तांच्या लाडक्या आपल्या मंडळाला या वर्षी 128 वर्ष होत आहेत. 1961 साली पानशेत  आणि खडकवासला धरण फुटल्यानंतर सध्या मंदिरात असलेली आपल्या मुर्ती 1962 मध्ये तयार केली गेली. खुप गणेशभक्तांना माहित नसलेली एक गोष्ट म्हणजे आपल्या मंडळाची मुर्ती नवी पेठ विठ्ठल मंदिरात मुर्तीकार देशपांडे काका यांनी तयार केली. विठ्ठल माऊली आणि गणपती बाप्पाचा एका गोड संगमाची ही एक विशेष पर्वणीच म्हणावी लागेल..... हत्ती गणपती मुळेच हा परिसर हत्ती गणपती चौक या नावाने पुणे शहरात प्रसिद्ध आहे. 

लाजवाब आणि जबरदस्त हे शब्द ज्या मंडळाच्या देखाव्यांना शोभुन दिसते ईतके आपले देखावे सुंदर असतात.... अतिभव्य आकाराच्या हलते देखावे ची मुर्ती हे आपल्या मंडळाचे वैशिष्ट्य. आजपण साधारणपणे 15 वर्षापुर्वीचा लंकादहनाचा देखावा ते मागील वर्षी चा  महाराक्षसाचा पर्यावरणाचा संदेश देणारा देखावा आजपण आम्हाला मनापासून आठवतो. हनुमानाची भलीमोठी मुर्ती डोळ्यांच्या पारणे फेडणारी  होती .... यानंतर रावणाचे  गर्वहरण, संभाजी महाराज यांचा जीवन प्रसंग आणि सामाजिक संदेश देणारे आकर्षक देखावे मंडळाने अत्यंत सुंदर रीतीने साकारलेले आहेत. 


आपल्या मंडळाच्या काही ज्ञात अज्ञात गोष्टी आम्हा पुणेकरांना नेहमी भावतात. 
1. पारंपरिक मिरवणूक-  डिजे डॉल्बी चा भिंत उभारण्यापेक्षा पारंपरिक वाद्य वाजविण्यावर भर तसेच मिरवणुकीत ट्रॅक्टर न लावता बैलजोडी ने पारंपरिक मिरवणूक काढणारे पुणे शहरातील आपले पारंपरिक रुढी परंपरा जपणारे मंडळ आहे..... "लोकमान्य टिळकांच्या मनातील गणपती मिरवणुक कशी असेल तर हत्ती गणपती मंडळासारखी असेल" असे आम्हाला आपल्या मंडळाच्या मिरवणुकीकडे पाहिल्यावर लक्षात येते. 

2. मंडळ म्हणंल की वर्गणी आलीच... पण कोणाकडूनही वर्गणी न घेता स्वखर्चाने गणेशोत्सव साजरा करणारे आपले मंडळाचा हे सर्वात सुंदर वैशिष्ट्य. 

3. गणेशोत्सवासाठी मांडव टाकताना खड्डे न घेता, रस्ता खराब न करणारी आपल्या मंडळाची मानसिकता ही सामान्य नागरिकांना सामाजिक संदेश देणारी आणि कौतुकास्पद आहे. 

4. वर्षभरात दुष्काळ आणि पुरगस्तांना मदत, परिक्रमी वीरांचा सत्कार, आरोग्यसेवा शिबिरासारखे सामाजिक उपक्रम राबवुन एकप्रकारची जनसेवा आपले मंडळ आणि मंडळाचे कार्यकर्ते अविरतपणे करीत आहे. 

गजराजावर रुढ असलेले गणराय वाघाला आपल्या त्रिशूळाला वार करताना चे चित्र विलोभनीय आहे. तो त्रास देणारा वाघ दुसरा तिसरा कोणी नसुन आजच्या काळातील करोना महारोग आहे. लवकरच बाप्पा त्यांचा नायनाट करुन आपल्याला या त्रासातून मुक्त करतील अशी आशा व्यक्त करतो. तसेच आपल्या मंडळाकडुन सामाजिक संदेश तसेच लहान थोरांना आकर्षित करणारे सुंदर देखावे आम्हा पुणेकर आणि पुण्यात येणाऱ्या गणेशभक्तांना पहायला मिळो आणि आपल्या मंडळाच्या  कार्यकर्त्यांकडून समाजातील सर्व घटकांची सेवा अविरतपणे घडत राहो ही सदिच्छा व्यक्त करतो. 


धन्यवाद

कळावे

प्रति, 
अखिल नवी पेठ हत्ती
गणपती मंडळ, छत्रपती
 संभाजी महाराज रोड, 
सदाशिव पेठ पुणे 30.


प्रेषक
आपल्या मंडळाच्या
सामाजिक कार्य आणि 
देखाव्यांचा तसेच 
गणेशमुर्ती चा चाहता
गणेशभक्त

विशेष सहकार्य आणि माहिती संकलन 
केदार दादा मानकर, तेजस ढोणे, कमलेश भांडे, आकाश इंगवले आणि प्रेम कांबळे

लेखक
गिरीश भोसले


पुणे शहरातील ज्या मंडळांनी  देखावे आणि डेकोरेशन ची ख्याती साता समुद्राच्या पलीकडे नेऊन महाराष्ट्रातील गणेशभक्तांना पुण्यात येऊन  देखावे आणि डेकोरेशन पहायला आनंदाने भाग पाडले त्या मंडळांसाठी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी

गुरुवार, २७ ऑगस्ट, २०२०

शाळेतली गणपती ची आठवण....

प्रति, 
कै. कॅ. शिवरामपंत
दामले प्रशाला, (महाराष्ट
मंडळ)वीर सावरकर नगर 
पुणे, 37 

सर्वात आधी तुझी क्षमा मागतो, 

कारण तुला पत्र लिहण्यास थोडा उशीर च झाला. दोन दिवस झाले तुला पत्र लिहायचे याचा विचार मनात येत होता. कारण पण तसंच होत. 

आपला गणेशोत्सव. 
आपल्या शाळेतला गणेशोत्सव तुझा हा लेक कधी विसरल का ग? 

आपल्या शाळेत ला गणेशोत्सव आजपण असा आठवतो की जशी काल च गोष्ट घडली आहे. गणपती च्या 1,2 आठवडे अगोदरच तु आणि आपले गुरुजण वर्ग तयारी सुरु करायचे. अथर्वशीर्ष पठणासाठी विद्यार्थी निवडायचे. सांस्कृतिक कार्यक्रमाची नोटिस वर्गात खाके आणि जाधव, उबाळे काका घेऊन यायचे हे अजून आठवतंय.

 त्या वेळी आपल्या प्रयोगशाळेच्या शेजारी गणपती ची स्थापना व्हायची. 
5 दिवस दररोज आरती आणि अथर्वशीर्ष पठण ....सौ. टकले मॅडम आणि काही विद्यार्थी मित्रांवर ही जबाबदारी असायची. 5 दिवस सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचल चालायची. बनकर सरांचे ते कविता आणि शब्दांमधले सांस्कृतिक कार्यक्रमांचा निवेदन कोण विसरणार आहे. आदरणीय पुलगम सर, गोखले मॅम, भुजबळ सर, हेगडकर सर, ढोबळे सर, वाकलकर मॅम,पाटील मॅम, साबळे मॅडम आणि पवार मॅडम वर खास करून जबाबदारी असायची. शेवटच्या दिवशी वाजत गाजत मिरवणूक निघायची... पण आपली शाळा शिस्तप्रिय असल्याने ढोल ताशे वाजताना विद्यार्थी मित्रांचे पाय थिरकायचे तरी पण सगळे शिक्षकांच्या धाकाने गप्प. देशमुख सर, तव्वर सर, वसईकर सर, सातपुते सर, आणि सगळ्यात जबरदस्त ज्यांचा हात लागायचा असे सर्जेराव सर आणि हेगडकर सरांची विद्यार्थी परिवारात दहशतच तशी होती. तरी पण एकदा आठवीत असताना आमच्या बॅच चा वर्ग मित्रांना ढोल तशाचा आवाज वाजलेला ऐकुन सहन न झाल्याने एका कोपऱ्यात आम्ही नाचायला सुरवात केली. आमचा उदय ढमढेरे तर तुफान नाचाला होता. त्याचा डांस पाहुन तर खुद्द मुख्याध्यापिका आंबेकर बाईंना पण हसु आवरले नव्हते. हा प्रसंग अजुन 15 वर्षानंतर अजून आठवतो. आणि सगळ्यात महत्त्वाचे गणपती झाल्यावर पोट भरुन वर्गात दिला जाणारा प्रसाद. अशा एक ना अनेक आठवणी आहेत. 

कशा असतात ना आठवणी. 
पत्राची सुरवात करताना खुप जास्त खुश होतो. पण पत्राच्या शेवटाकडे जाताना 15 वर्षे पुर्वीच्या गोष्टी आठवुण मन भरून येतय. 

आज आपले विद्यार्थी 7 समुद्राच्या पलीकडे गेले असतील पण शाळेतला गणपती आणि त्या गोड आठवणी विसरणे शक्य नाही..... 

आज करोना मुळे शाळा बंद आहे नाही तर आजपण त्याच जोशात गणेशोत्सव साजरा केला असता यात शंका नाही. या महामारी नंतर लवकरच तुला भेटायला येईल कदाचित 26 जानेवारी लाच. तोपर्यंत तु तुझी काळजी घे. 

कळावे, 

तुझंच विद्यार्थी रुपातलं
लेकरु


आपल्या प्रशालेला आणि सर्व गुरुजनांना सदर पत्र समर्पित. 

प्रति, 
कै. कॅप्टन शिवरामपंत
दामले प्रशाला (महाराष्ट्र
मंडळ) वीर सावरकर नगर
पुणे 37

प्रेषक
तुझा विद्यार्थी
जो आजपण तुझा 
आठवणीत रंगतो


संकल्पना आणि लेखन
अॅड. गिरीश भोसले
दिनांक 28 आॅगस्ट 2020

भव्य म्हणजे राजर्षी शाहू चौक ❤

भव्य म्हणजे शाहू चौक


राजर्षी शाहू चौक
सार्वजनिक गणेशोत्सव
मंडळ, छत्रपती शिवाजी
महाराज रोड, आंगरेवाडा
समोर, पुणे -2


शाहु चौक.....  जरी शाहू चौक नाव एकलं तर फक्त डोळे समोर फक्त दोनच गोष्टी येतात. 
1. फक्त नाव च पुरेसे आहे हे विशेषण ज्याला लागु होते असा आंग्रे वाडा. 
2.आणि भव्य उपमा ज्या मंडळाला शोभुन दिसते असे राजर्षी शाहू चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ,छत्रपती शिवाजी महाराज रोड रजिस्टर नंबर ई/1580


ज्या मंडळाची कलाकृती पाहताना मान वर करूनच पहायला लागतं आणि ज्या मंडळाच्या मिरवणुकीत तरुणांच्या संख्येएवढीच तुफान तरुणींची संख्या पहायला मिळणार मंडळ म्हणजे .......देखावें पासुन साऊंड पर्यंत भव्य दिव्य गाजवणारे आणि नाचवणारे मंडळ म्हणजे आपलं शिवाजी महाराज रोड वरील राजर्षी शाहू चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. 

1922 साली स्थापन झालेलं मंडळ पुढच्या 2 वर्षात आपलं शतक पूर्ण करत आहे त्या बद्दल मंडळाचे आणि मंडळाचे कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन. 

मंडळाचे स्थापनेपासून भव्य देखावे करण्याची परंपरा असलेलअसलेल्या आपल्या मंडळाने गणेशभक्तांना आकर्षित करण्यास नेहमीच यश मिळवले आहे. आपल्या मंडळाचे सुरवातीच्या काळात लायटिंग साठी आपले मंडळ प्रसिद्ध होते. त्यांनंतर कारगिल युद्ध, समुद्र मंथन, कालियामर्दन, सिताहरण यांसारखे देखावे मंडळाने करुन गणेशभक्तांना आपल्या कडे आकर्षित करण्यासाठी भाग पाडले...... 
अलिकडच्या काळात अमरनाथ मंदिर,श्री क्षेत्र जेजुरी, तिरुपती बालाजी मंदिर, शिर्डी, जयपूर पॅलेस आणि पॅगोडा यांच्या सारख्या सुंदर कलाकृती करुन गणेशभक्तांना पुणे शहरातच भारतातील प्रसिद्ध देवस्थानांच दर्शन याची देही याची डोळा करून दिले.  वणी देवी मंदिराचा चा देखावा ईतका सुंदर केला होता की अनेक सेलिब्रिटींनी त्या वेळी आवर्जून उपस्थिती लावली होती. 
गावामधील ऊरूस हा पुणे शहरात जिंवत ठेवण्याच श्रेय आपल्या मंडळाला जाते. आजपण त्या ढोल ताशा स्पर्धची आवर्जून आठवण येते. निराधार आणि अनाथ मुलांसोबत दहीहंडी साजरा करुण व त्यांना गरजोऊपयोगी वस्तू देऊन त्यांच्या मोठ्या भावाची सावली देणारे तरुण कार्यकर्ते सुध्दा या मंडळात आहे. समाजा समोर एक नवीन आदर्श या कार्यक्रमातुन आपल्या मंडळाने ठेवलेला आहे याचा आम्हाला नक्कीच अभिमान आहे


आपल्या मंडळाचे सर्वात महत्त्वाचे आकर्षण म्हणजे मंडळाचे गणेश मूर्ती. अगदी सुंदर आणि देखणी असलेली मुर्तीचे डोळे अप्रतिम. जणू काही बाप्पा आपल्याकडेच पहात आहे का काय असा भास भक्तांना होतो. 

राजर्षी शाहू महाराज यांच्या नावाला शोभेल असे आपल्या मंडळाचे नाव, कार्य आणि आणि कलाकृती मुळेच भव्य म्हणजे राजर्षी शाहू चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हि साजेशी अशी उपमा आपल्या मंडळाला शोभुन दिसते. 

पुढच्या वर्षी आणि शतकोत्तर वर्षी  आपल्या मंडळाकडून एक सुंदर कलाकृती पहायला आणि एक जबरदस्त साऊंड च्या आवाजावर पाय थिरकायला आम्ही पुणेकर तरुण एका पायावर तयार आहोत, 
अशी सदिच्छा व्यक्त करतो. 


धन्यवाद

कळावे. 


राजर्षी शाहू चौक
सार्वजनिक गणेशोत्सव
मंडळ, छत्रपती शिवाजी
महाराज रोड, आंगरेवाडा
समोर, पुणे - 2


प्रेषक
एक पुणेकर तरुण
जो आपल्या मंडळाचा, 
कलाकृती चा आणि साऊंड
 सिस्टीम चा फॅन आहे

पुणे शहरातील ज्या मंडळांनी  देखावे आणि डेकोरेशन ची ख्याती साता समुद्राच्या पलीकडे नेऊन महाराष्ट्रातील गणेशभक्तांना पुण्यात येऊन  देखावे आणि डेकोरेशन पहायला आनंदाने भाग पाडले त्या मंडळांसाठी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी.❤️

संकल्पना
आकाश मुसळे

लेखन
गिरीश भोसले
27.8.2020

बुधवार, २६ ऑगस्ट, २०२०

लायटिंग चा बादशाह नातुबाग मंडळ

प्रति, 
नातुबाग मंडळ, 
 राजा केळकर संग्रहालय
जवळ, सदाशिव पेठ
श्रीमंत थोरले बाजीराव
 पेशवे रोड, पुणे 2

पत्र लिहण्यास कारण की, 

लायटिंग म्हणलं की नातुबाग.... आणि नातुबाग म्हणलं की लायटिंग... ही जोडी ठरलेली आहे.... आणि कुठल्याही पुणेकराला  या गोष्टींमध्ये तडजोड केलेली आवडणार नाही.....कारण पण तसेच आहे.....जबरदस्त आणि भव्य लायटिंग चा बादशाह असलेले आपलं मंडळ म्हणजे गणेशोत्सव काळातली गणेश भक्तांसाठी एक सुंदर पर्वणीच...... संगीताच्या तालावर चालणारी भली मोठी लायटिंग डोळे दिपवून टाकती.....  डोळे दिपवणारा आणि अगदी शनिपार चौकातुन सुध्दा सहज दिसणारे  आपलं मंडळ आहे.
ज्या वेळी भारतीय चित्रपट सृष्टीतील गाण्यांवर लायटिंग चमकते ना तेव्हा भल्याभल्यांचे पाय डांस साठी थिरकायला लागतात. 
आज पण मला तो 13 वर्षापूर्वी चा क्षण आठवतोय. अनंत चतुर्दशी चा आदला दिवस होता.भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेत एम् एस धोनी च्या नेतृत्वाखाली टि 20 विश्वचषक जिंकला होता... त्यावेळी साधारणपणे भारतात रात्रीचे 9 वाजले होते. मंडळाच्या स्पिकरवर सुनो गौर से दुनियावालो च्या गाण्यावर तरुणाई आनंदाने नाचत होती. त्यावेळी 10 वी मध्ये असलेला मी पाय दुखेपर्यंत बेभान नाचलो होतो.... पण सध्या तरी मागच्या काही वर्षी चा मंडळाचे लायटिंग च्या विडिओ पाहुन मन भरवतोय......
पण पुढच्या वर्षी गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी लायटिंग च्या पहिल्या गाण्याचा साक्षीदार मी असेल याची ग्वाही देतो... आणि लायटिंग चा बादशाह असलेल्या आपल्या मंडळाला आणि कार्यकर्ते बांधवांना समस्त पुणेकरांच्या वतीने शुभेच्छा देतो. 

करोना मुळे या वर्षी घेतोय आम्ही तरुण पोर घेतोय ब्रेक..... 
पण पुढच्या वर्षी नातुबाग मंडळसमोर गर्दी असणार रेकार्ड ब्रेक. 

धन्यवाद

कळावे. 

प्रेषक
एक पुणेकर
जो दरवर्षी नातुबागची लायटिंग
चा मनापासून चाहता आहे

प्रति, 
नातुबाग मंडळ, 
 राजा केळकर संग्रहालय
जवळ, सदाशिव पेठ
श्रीमंत थोरले बाजीराव
 पेशवे रोड, पुणे 2


टिप्पणी - सदर लेख पुण्यातील त्या तरुणाच्या नजरेतून लिहलेला आहे की जो कायमचा नातुबाग मंडळाच्या लायटिंग चा चाहता आहे. 

संकल्पना
प्रेम कांबळे

विशेष सहाय्य
आकाश इंगवले, कमलेश भांडे

लेखन
गिरीश भोसले

मंगळवार, २५ ऑगस्ट, २०२०

छत्रपती राजाराम मंडळ

प्रति, 
छत्रपती राजाराम मंडळ, 
871, सदाशिव पेठ रोड, 
पेरुगेट पुणे 30,

पत्र लिहण्यास कारण की,

पुणे शहरातील  वृध्दांना, तसेच काही सामान्य लोकांना  कामाअभावी, वेळेअभावी, आर्थिक चणचणीमुळे भारतातील देवस्थानांच्या दर्शन ला जाता येत नाही. पण आपल्या मंडळाने पुणे शहरातच येत्या काही वर्षांत याची देही याची डोळा दर्शन घडवून आणले..... 

हुबेहूब प्रतिकृती ऊभी करावी तर कोणी तर याच ऊत्तर एकच तर.....सदाशिव पेठ मधील राजाराम मित्र मंडळाने........हे समीकरणच तुम्ही तयार केले.

तुळजापूर आणि कोल्हापूर येथील मंदिर, अक्षरधाम आणि वेल्लोर चे सुवर्ण मंदिर हे तुम्ही पुण्यात अवतरुण दाखवले. 125 व्या वर्षानिमित्त केलेला जय मल्हार जेजुरी चा आणि त्या नंतर शिर्डी साईबाबा मंदिराची प्रतिकृती ईतकी अप्रतिम होती की साक्षात जेजुरी आणि शिर्डी ला प्रत्यक्षात पुणे शहरात अवतरलेचा भास तुम्ही आम्हाला करून दिलात.देवा खंडोबा ची आणि साईबाबांची मुर्ती ईतकी हुबेहूब होती की डोळ्यांच पारणे फिटत होते. 
मंदिराची प्रतिकृती उभी करावी तर छत्रपती राजाराम मंडळानेच असे पुणेकर का म्हणतात याच ऊत्तर आपली मंडळाची कलाकृती पाहिल्यावर च समजते. ज्या मंडळाच्या नावातच छत्रपती, राजा आणि राम असे तिन्ही, मंडळाला साजेसे असे शब्द आहे यातच मंडळचा भव्य दिव्य पणा दिसुन येतो. 

या वर्षी करोनाच्या प्रादुर्भावामुळे गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. पण पुढच्या वर्षी आपल्या मंडळाकडून एक सुंदर हुबेहूब देवस्थानाचे दर्शन 
 अशी सदिच्छा व्यक्त करतो... 

धन्यवाद

कळावे. 

प्रति, 
छत्रपती राजाराम मंडळ, 
871, सदाशिव पेठ रोड, 
पेरुगेट पुणे 30,

प्रेषक
एक पुणेकर, 
जो आपल्या मंडळाच्या 
कलाकृती ची आठवण 
कायम मनात साठवून ठेवतो. 


संकल्पना आणि लेखन
गिरीश भोसले
दिनांक. 26.8.2020




सेवा परमो धर्म❤


प्रति, 
सेवा मित्र मंडळ........ 
258, शुक्रवार पेठ, सेवा 
मित्र मंडळ चौक, पुणे 2


पत्र लिहण्यास कारण की, 

आपल्या पुणे शहराला गणेशोत्सवामध्ये देखाव्यांची परंपरा आहे. पण या देखाव्यांतुन समाजप्रबोधन करणारे अग्रगण्य असणारे मंडळ म्हणजे आपलं सेवा मित्र मंडळ. 
काही मंडळाच्या नावातच त्यांच कार्य नमूद केलेले असते. याचं सुंदर उदाहरण म्हणजे शुक्रवार पेठेतील आपले सेवा मित्र मंडळ. सेवा परमो धर्म हे ब्रीदवाक्य असलेले मंडळ समाजप्रबोधन पर काम नेहमीच करत आलेले आहे आणि आजही अविरत पणे चालू आहे. करोना संसर्गामुळे सगळीकडे साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा होत असताना सेवा आॅनलाईन महा गणेशोत्सव 2020 हा  उपक्रम मनापासून कौतुक करण्यासारखा  चालू केला आहे. शिवाजी महाराजांचा आणि मावळ्यांचा ईतिहास, प्रबोधन करणारे प्रवचन, नवीन उद्योजकांना प्रेरणा देण्यासाठी आॅनलाईन संवाद, शिवव्याख्यान, व शौर्यगाथा असे एक ना अनेक कौतुकास्पद उपक्रम आपण आॅनलाईन पध्दतीने राबवत आहात. केवळ गणेशोत्सव काळात समाजसेवेचा संदेश न देता वर्षभर समाजउपयोगी  उपक्रम कसे राबवता येतील याकडे आपल्या मंडळाचे विशेष लक्ष असते. 
पाणी, आत्महत्या, शिक्षण, वाहतूक समस्या, दहशतवादाविरोधात लढाई,  असे सामान्य माणसाच्या आयुष्यातील साधे साधे पण अत्यंत महत्त्वाचे असणारे प्रश्न आपण आपल्या सामाजिक देखाव्यांच्या आणि मिरवणुकीतील चित्र रथांचा माध्यमातून  मांडले आहे.


अंध भगिनींचा मंडळातर्फे आयोजित केलेला विवाह, शहीद पोलीस आणि सैनिक बांधवांच्या परिवार सोबत साजरे केलेले उपक्रम, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी ,  लहान मुलांसाठी मेळावे, अंध अपंगांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीचे, अनाथ बालकांसाठीचे मेळावे असे शेकडो उपक्रम आपल्या मंडळातर्फे वर्षभर अविरतपणे सुरू असतात. या उपक्रमांचे कौतुक करेल तेवढे कमी आहे. याच कारणांमुळे आणि आपल्या समाज सेवेचा वारसा निरंतर चालवत असल्या कारणाने आपल्या सेवा मित्र मंडळाने आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळवले आहे. 

आपल्या मंडळाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आपल्या मंडळाचे कुठल्याही कार्यकर्त्या ने समाजसेवक, जनसेवक नावाचा कुठलाही टॅग न लावता अत्यंत साधेपणाने आपले कार्य निरंतरपणे करत वारसा जपलेला आहे. एक पुणेकर म्हणून आम्हाला आपल्या मंडळाचा आणि आपल्या मंडळाचे लहान थोर कार्यकर्ता बांधवांचा आम्हाला एक भारतीय नागरिक म्हणून मनापासून आनंददायीअभिमान आहे.

पत्राच्या शेवटी फक्त एकच सदिच्छा व्यक्त करतो की, आपल्या मंडळाकडून असेच नवनवीन उपक्रम आणि देखावे तसेच मिरवणुकीत पुस्तक रथासारखे  संदेश देणारे उपक्रम, आपल्या भारतीय बांधवांना  पहायला मिळो आणि देशाला गरज असलेल्या  सेवादुतांची फौजेची नवीन पिढी आपल्या सेवा मित्र मंडळाचा माध्यमातून तयार होत राहो.... 

कळावे, 

धन्यवाद. 


प्रति, 
सेवा मित्र मंडळ........ 
258, शुक्रवार पेठ, सेवा 
मित्र मंडळ चौक, पुणे 2

प्रेषक, 
आपल्या मंडळाचा आणि
कार्यकर्ते मंडळींच्या कार्याचा
सार्थ अभिमान असलेला
एक पुणेकर


टिप्पणी- सदर लेख हा आपल्या मंडळाचे कार्य पहात आलेल्या पुणेकर  नागरिकांच्या नजरेतून लिहलेला आहे. आपल्या मंडळाचे कार्य अगणतिक असल्याने ,सगळ्या उपक्रमांचा उल्लेख करणे शक्य नसल्याने मंडळाचे ठराविक उपक्रम नमूद केलेले आहे. 

संकल्पना आणि लेखन
गिरीश भोसले
दिनांक 25.8.2020

आम्ही पुन्हा येऊ...... ❤

करोना च्या पादुरभावामुळे या वर्षी आपण सर्व जण जवळपास महत्त्वाचे सर्व सण अगदी साधेपणाने शारिरीक अंतर राखून साजरे करत आहोत

या वर्षी रस्त्यावर ना दहीहंडी असेल ना असेल गणेशोत्सवाची धुमधाम......  

 ढोल ताशांचा निनाद नसेल ना डिजे डॉ ल्बीचा दणदणाट .... 
ना डेकोरेशन.... ना देखावे.... ना लायटिंग.... ना अथर्व शिरष  पठन
नसेल गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्ता यांची लगबग..... 
शेवटच्या दिवशी टॅक्टर वर चढुन नाचण्याची मजा पण या वर्षी नाही. 

दहीहंडी चे थर नाही ना स्पिकरच्या दणक्यात नाचणारी तरुणाई नाही.. 


15 आॅगस्ट ला शाळेत झेंडा वंदन ला शाळा काॅलेज मध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती नाही.... ना त्यांचे संचलन
 
असतील फक्त आणि फक्त मागील वर्षी च्या आठवणी..... 


पण...... 

पुढच्या वर्षी परत  येऊ तोच
 जोष , तीच ईच्छाशक्ती घेऊन.....आणखी तयारी निशी.....कदाचित आणखी जोरदार.... 

परत घेऊन  येऊ तोच ढोल ताशांचा दणदणाट 

परत येउ डॉल्बी च्या आवाजावर  ट्रॅक्टर वर बेभान डांस करण्यासाठी.... 


पुन्हा येऊ गणपती बाप्पा च जोरदार आगमन करण्यासाठी

परत येऊ पुढच्या स्वातंत्र्य दिनी आपल्या तिरंगा ध्वजाला कडक सॅल्यूट देण्यासाठी..... 

परत येऊ वारकरी बांधवांची मनोभावे सेवा करण्यासाठी आणि शेकडो मैल अंतर चालून आपल्या विठ्ठल माऊली च्या चरणी डोक ठेवण्यासाठी... 

तोच थाट घेऊन पुढच्या वर्षी भेटु आपल्या मित्र परिवारासह त्याच ठिकाणी

तोपर्यंत काळजी घ्या

धन्यवाद


आतुरता 2021 ची......❤

या वर्षी घेऊ ब्रेक..... 
पुढच्या वर्षी रेकार्डब्रेक......

 लेखन, आणि  संकल्पना
गिरीश भोसले

 सदर लेखाची पाहण्यासाठी आणि डाऊनलोड करण्यासाठी युट्युब लिंक... 
https://youtu.be/CByL2pPRpgM


सोमवार, २४ ऑगस्ट, २०२०

आपला खडकचा हारांचा राजा

खडकचा राजा...... ❤️

खडक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. 
पत्ता - जुना 1039, 635, घोरपडे पेठ, खडकमाळ आळी 411042
खडक पंच मंडळ पब्लिक ट्रस्ट नं - ऐ 765
शतकाच्या उंबरठ्यावर ....1️⃣0️⃣0️⃣

1.पुण्यात सर्वप्रथम विद्युत रोषणाई कुठल्या मंडळाने चालू केली.? 💡
2. पुण्यात 1988 साली विसर्जन मिरवणूक टिळक🕺🏻 रोड ला कुठल्या मंडळाने चालू केली? 
3.पुण्यात पहिल्यांदा संगीताच्या तालावर कारंजे⛲ कुठल्या मंडळाने केले. 

प्रश्न भले वेगवेगळे असो पण याचं इतर फक्त एकच, ते म्हणजे
खडक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ...... आपला सर्वांचा लाडका खडकचा राजा..... ❤️

साधारणपणे 16-17 वर्षापूर्वी ची गोष्ट असेल.
मंडळाने संत तुकाराम महाराजांचे वैकुंठगामन हा देखावा केला होता..... 
भल्या मोठ्या आकाराची गरुडाची🦅 मुर्ती आणि त्यावर संत तुकाराम महाराजांची तेवढीच ऊंच मुर्ती. तर दुसऱ्या बाजूला तेवढे चांगले आकाराची विठ्ठलमाऊली ची मुर्ती... 
मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आवर्जून सांगतात की, गरुडाची🦅 मुर्ती वर खाली झाली की लहान मुलं घाबरून रडायची.... ईतकी प्रचंड आकाराची मुर्ती होती. आणि ती मुर्ती विसर्जन मिरवणुकीत टिळक रोडने नेण्यात आली होती हे सुद्धा आवर्जून सांगतात...... ❤️
 आतापर्यंत पुणेकरांनी पाहिलेला हाच तो महाकाय देखावा असणार या बाबत शंका नाही... कदाचित याच वैशिष्ट्यांमुळे मंडळाला सर्वात जास्त गर्दी खेचणारा पुरस्कार 🏆मिळाला आहे. 

यानंतर इंद्रजित लक्ष्मण महायुद्ध,🏹, ज्ञानेश्वर महाराजांचा भिंतीचा देखावा, संगीताच्या तालावर कारंजे,⛲ श्रीकृष्णलीला, पावनखिंड,⚔️ आगासुराचा👹 वध ईत्यादी सुंदर देखावे दरवर्षी करण्यात आले आणि ती परंपरा आजही कायम चालू आहे. सर्व प्रकारचे डेकोरेशन आणि देखावे केलेले एकमेव अष्टपैलू मंडळ म्हणजे आपलं मंडळ. 

हारांचा राजा💐 म्हणून प्रसिद्ध असलेले आणि सामाजिक बांधिलकी जपणारे आपले मंडळ या वर्षी करोना च्या प्रादुर्भावामुळे साधेपणाने गणेशोत्सव साजरा करीत आहे. पण लवकरच सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करताना तुकाराम महाराजांचे वैकुंठगमनासारखा भव्य दिव्य डोळे दिपवणारा देखावा समस्त पुणेकर आणि महाराष्ट्रातुन येणाऱ्या गणेशभक्तांना पहायला मिळावा ही सदिच्छा व्यक्त करतो.❤️

धन्यवाद. ...🙏🏻

महत्त्वाची टिप्पणी - तुकाराम महाराजांचे वैकुंठागमन देखावा साजरा करताना मंडळाने गरुड आणि तुकाराम महाराज यांच्या मुर्ती समोर फोटो📸 काढण्याची व्यवस्था केली होती. आपणाकडे त्या काळातील किंवा मंडळाच्या ईतर देखाव्यांचे फोटो📷 असतील तर नक्की कमेंट करा.

संकल्पना आणि लेखन🖋️
गिरीश भोसले
 

पुणे शहरातील 51 मंडळे

1.कसबा गणपती

2. तांबडी जोगेश्वरी गणपती

3.गुरुजी तालीम गणपती

4. तुळशी बाग गणपती

5.केसरीवाडा गणपती

6. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती

7. छत्रपती राजाराम मंडळ

8. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

9. अखिल मंडई मंडळ

10. हुतात्मा बाबू गेनू मंडळ 

11. नातुबाग मंडळ, बाजीराव रोड

12. खडक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, खडक माळ आळी

13. राजषीऀ शाहु चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, छ. शिवाजी महाराज रोड

14. चिमण्या गणपती, सदाशिव पेठ

15.जिलब्या मारुती गणपती, मंडई जवळ

16. निंबाळकर तालीम मंडळ, सदाशिव पेठ

17. अकरा मारुती कोपरा, शुक्रवार पेठ

18.  हिराबाग मित्र मंडळ, टिळक रोड

19. हत्ती गणपती मंडळ, टिळक रोड

20. खजिना विहीर मित्र मंडळ, टिळक रोड

21. शनिपार मित्र मंडळ, शनिपार

22. लक्ष्मीनगरचा राजा मंडळ, लक्ष्मीनगर

23. गरुड गणपती - नारायण पेठ

24. जयनाथ तरुण मित्र मंडळ - धनकवडी

25.शनिपार मंडळ  शनिपार, बाजीराव रोड

26. शितळादेवी मंडळ, शितळादेवी चौक, गुरुवार पेठ

27. संयुक्त भांडे आळी मित्र मंडळ भांडे आळी

28. सेवा मित्र मंडळ शुक्रवार पेठ

29.  महाराष्ट्र जोशी समाज तरुण मंडळ, हिराबाग जवळ

30. वंदे मातरम संघ सदाशिव पेठ

31. मार्केट यार्ड मंडळ, मार्केट यार्ड

32. बालवीर मित्र मंडळ, घोरपडे पेठ

33.लाकडी गणपती, शिवाजी 

34. साने गुरुजी तरुण मंडळ, एसपी काॅलेज मागे

35. आझाद मित्र मंडळ, लक्ष्मी रोड

36. हनुमान व्यायाम मंडळ, घोरपडे पेठ

37.श्रीमंत सुवर्ण भारत मित्र मंडळ

38.स्वारगेट पोलीस लाईन मित्र मंडळ

39. वीर नेताजी तरुण मंडळ, गुरुवार पेठ

40. म्हसोबा मित्र मंडळ, फडके हौद

41. विनायक मित्र मंडळ, सहकार नगर

42.शुर शिवबा मित्र मंडळ कात्रज

43. विजय मारुती मंडळ नारायण पेठ

44. मुंजाबाचा बोळ मित्र मंडळ नारायण पेठ

45. शिवाजी नगर पोलीस वसाहत युवक मित्र मंडळ

46. नवजवान मित्र मंडळ कोथरूड

47. खडक पोलीस लाईन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ 

48. गणेश आझाद हिंद मंडळ,  बुधवार पेठ

49. बनकर तालीम संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ भवानी पेठ

50. नवरंग युवक मित्र मंडळ भवानी पेठ

51. शिवदर्शन मित्र मंडळ,


* वनराज मंडळ, शिवाजी रोड

टिप्पणी - सर्वच मंडळाची नावे लिहणे शक्य नसल्यामुळे आपल्या मंडळाचे नाव कमेंट्स मध्ये नमुद करा......


जय शार्दुल ❤

जय शार्दुल........ 

पुणे शहर गणेशोत्सवामध्ये देखाव्यांसाठी प्रसिद्ध तर मुंबई शहर ऊंचच ऊंच विविध प्रकारच्या गणेश मुर्तींसाठी प्रसिद्ध....... 

प्रत्येक मंडळाचे काही ना काही वैशिष्ट्ये असतात. पण पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात सामाजिक वारसा जपणारे आणि पंचाहत्तरी च्या उंबरठ्यावर असणारे एक मंडळ आहे. 
  शार्दुल म्हणजे हिंदी भाषेत अर्थ पहायचा झाला तर "सगळ्यात चांगला" . आपल्या नावाला साजेसे असलेले शार्दुल मित्र मंडळ ,गुरुवार पेठ हे पुण्याच्या मध्यवर्ती भागातील महत्त्वाचे  आणि विविधतेतुन एकता हा संदेश देणारे महत्त्वाचे मंडळ आहे.भक्तांचे श्रध्दास्थान असलेले लालबाग च्या राजा मंडळाची 1942 सालची मुर्ती आणि शार्दुल मित्र मंडळाची मुर्ती अगदी जुळ्या भावांसारखे नखशिखांत एकसारख्या आहेत.
या मंडळाचे एक वैशिष्ट्य आहे. 
मंडळाचे गणेशमुर्ती ला विविध प्रकारच्या वेशभूषा करता येणारे समस्त भारतातील एकमेव असे हे मंडळ आहे. 

मुर्तीला वैविध्यपूर्ण पोषाखाचा पेहराव करणे हे या मंडळाचे खास वैशिष्ट्य. 
छत्रपती शिवाजी महाराज, साईबाबा, वीर तानाजी मालुसरे, बाळ गंगाधर टिळक, मल्हारी मार्तंड खंडोबा, धनगर पेहराव, धोती पायजमा, चाचा नेहरू, पाटिल, व्यापारी या सर्वांचा पेहराव केवळ एकाच गणेशमूर्ती ला करण्यात आलेला आहे. आणि आजही सामाजिक संदेश देणारी परंपरा अविरतपणे चालू आहे. या गोष्टींचे संपुर्ण श्रेय हे बाबासाहेब चौधरी ज्यांना लाडाने आणि मानाने सगळे जण काका म्हणतात त्यांना जाते. मंडळाचे लहान थोर कार्यकर्ते ही त्यांना या कामात मदत करतात. मंडळाला सामाजिक आणि पौराणिक हलते देखाव्यांची सुध्दा परंपरा आहे. त्यामुळेच पुणे शहरातील आपले वेगळे पण जपणारे शार्दुल मित्र मंडळ आपल्या पुणे शहरातील गणेशोत्सवात  भर टाकत आहे...... 

गणेशभक्तांना दरवर्षी मंडळाची नवनवीन पेहरावातील मुर्ती व सुंदर देखावे पहायला मिळो ही सदिच्छा व्यक्त करतो. 

धन्यवाद

लेखन
गिरीश भोसले

रविवार, २३ ऑगस्ट, २०२०

पत्र लिहण्यास कारण की......

 प्रति, 

प्रिय, 
हिराबाग मित्र मंडळ
टिळक रोड, पुणे 30


पत्र लिहण्यास कारण की , 

पहिले तुम्ही ओळखलं का सांगा अगोदर मला? अहो मी तोच आहे......तुमच्या मंडळाचा आणि दरवर्षी गणपती मधले देखावे पहाण्यासाठी ऊतवळा असणारा लहान पोरगा. पण तो लहान पोरगा आता मोठा झालाय बरं का.  17-18 वर्षा पूर्वी तुमचे देखावे पाहण्यासाठीचा आसुसलेला चातक पक्षी असलेला मी आज पण तुमचे पाहिलेल्या चित्तथरारक देखावे चा भक्त आहे..... ❤
आज पण मला तुमचे, नरसिंह अवतार, गणरायाची जलआरती, गणेश जन्म, हनुमानचे महाऊड्डाण, दुर्गा माता चा महाकाली अवतार, श्रीकृष्ण लीला, हे देखावे आवर्जून आठवतात. महाभारत आणि रामायणातील प्रसंगावर आधारित असलेले पुणे शहरातील सर्वात सुंदर आणि उत्तम देखावे होते... 
श्रीकृष्णाचे विराट रुप हा मला आठवत असलेला तुमचा पहिला देखावा.
लहानपणी आमचे चुलते दरवर्षी गणपती पहायला नेत असत. त्या वेळी पहिला देखावा कुठला पाहणार, तर हिराबाग मित्र मंडळ हे ठरलेलं गणित.....चुलत्यांच्या खांद्यावर बसुन आणि तुफान गर्दीत हाताला घट्ट पकडून पाहिलेले देखावे हे आजसुद्धा मनात साठवून ठेवले आहेत. चुलत्यांनी देखावे दाखवल्यानंतर परत आईवडिलांपाशी केलेला तुमचा देखावे पाहण्यासाठी चा हट्ट अशा एक ना अनेक आठवणी आहेत. जसे जसे तरुण झालो तसे मित्रांबरोबर गणपती पहायला जायला लागलो. पण गणित तेच ठरलेलं. पहिला मान हिराबाग मित्र मंडळाचा . 

नरसिंह अवतार आणि कालीमातेचा अवतार ईतका अप्रतिम केला होता की लहान मुलं त्यां मुर्तींना पाहुन आणि आवाज ऐकून घाबरायचे. राहुल सोलापूरकर काकांचा निवेदनाचा आवाज तर अजुन पण आठवतो. हनुमानचे संजिवनी आणण्यासाठी केलेले उड्डाण तर एकच नंबर होतं.... मांडवासमोर असलेल्या झाडाचा किती सुंदर वापर केला होता तुम्ही. "तो देखावा संपल्यानंतर पवनपुत्र हनुमान की जय" चा आवाज ठोकणारा तो तरुण पण मीच बरं का.... ❤

पण साधारण पणे 3,4 वर्ष झाले तुमचे चित्तथरारक देखावे पहायला नाही मिळाले ओ. कारण माहित नाही पण आता आपल्या मंडळाचे देखावे केले जात नाही... गणेशोत्सव असो किंवा नसो टिळक रोड वरुण जाताना तुमच्या देखावे ची आठवण नक्की येते... पण तुमच्या चित्तथरारक देखाव्यांची  उणीव जाणवतेच.... यावर्षी तर करोना च्या संसर्गामुळे साधेपणाने गणेशोत्सव साजरा होत आहे पण पुढच्या वर्षी तुमचे चित्तथरारक देखावा पाहण्यासाठी आतुर असलेला एक तूमचा निस्सीम चाहता तुमची वाट पाहतोय रे..... आणि माझ्या सारखे असंख्य पुणेकर आणि महाराष्ट्रातुन गणपती पहायला येणारे गणेशभक्त सुध्दा माझ्या सारखीच वाट पहात आहेत तुमच्या देखाव्यांची....

परत या ना , तोच राहुल सोलापूरकर काकांचा आवाज आणि चित्तथरार देखाव्यांची परंपरा पुन्हा घेऊन या ना. 


तुमच्या देखाव्यांची वाट पाहत
असलेला तुमचा चाहता
प्रेषक, 
गिरीश मधुकर भोसले
रा. पुणे शहर

प्रति, 
हिराबाग मित्र मंडळ
हिराबाग चौक, टिळक रोड
पुणे - 411030

माझ्या स्वप्नातील पुणे शहर...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले माझं पुणे शहर सध्या पोर्शे कार अपघात आणि ३०० शब्दांचा निबंधानी भलतेच चर्चेत आलंय. खरंच अ...