सोमवार, १४ सप्टेंबर, २०२०

भाग 1 - आठवण जल्लोषाची.... भारतीय संघाने जिंकलेल्या पहिल्या वहिल्या टि-20 विश्वचषकाची 2007

 

बरोबर आजच्या दिवशी 13 वर्षापूर्वी भारत आणि पाकिस्तान मधील क्रिकेट प्रेमींचे श्वास रोखले होते. 
कारण पण तसंच होतं. 
पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांचा टि 20 विश्वचषकातील एकमेकांविरोधात खेळला गेलेला पहिला बाॅल आऊट वाला थरारक सामना. 

दिनांक 14 सप्टेंबर 2007
स्थळ - डरबन,  दक्षिण आफ्रिका, सामना क्र. 10   प्रथम टि 20 विश्वचषक 2007

2007 च्या 50 षटकांच्या विश्वचषक स्पर्धेतील पहिल्याच फेरीतील मानहारक पराभवानंतर  सचिन , द्रविड आणि गांगुली या त्रिकुटाच्या माघारी नंतर नवख्या महेंद्र सिंग धोनी च्या नेतृत्वाखाली अत्यंत नवखा आणि युवा खेळाडूंचा भरणा असलेला भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला रवाना झाला. 


पहिला स्कॉटलंड विरुद्ध चा सामना पावसामुळे रद्द झाला आणि पुढच्या फेरीत जाण्यासाठी भारतीय संघाला पाकिस्तान विरुद्ध चा सामना जिंकणे अनिवार्य होते. 
शोएब मलिक ने टाॅस जिंकून भारतीय संघाला फलंदाजी साठी आमंत्रित केले. पहिल्या ओवरमध्ये गंभीर, तिसऱ्या ओवरला सेहवाग, पाचव्या ओवरला युवराज आणि सातव्या ओवरला कार्तिक ने पॅव्हिलियन चा रस्ता धरला.   पण त्यांनंतर राॅबिन ऊथ्थपाच्या अर्धशतकांसह आणि धोनी च्या 33 आणि इरफान च्या झटपट 20 धावांमुळे भारतीय संघाने 20 षटकांत 9 गडी गमावून 141 धावा केल्या. 

अत्यंत साधे वाटणारे लक्ष्य सहज पार करू या हेतूने पाकिस्तान चा संघ फलंदाजी ला आला. पण झालं ऊलटंच ठराविक अंतरावर विकेट पडत गेल्या. पण मिसबाह ऊल हकने एका बाजूने किल्ला लढवून ठेवला होता. अवघड वाटणारे लक्ष्य त्यांने एकदम सोपे करुन टाकले. शेवटच्या दोन चेंडूवर केवळ एका धावेची गरज असताना सुध्दा पाकिस्तान संघाला रोखण्यात भारतीय संघाला यश आले आणि सामना टाय झाला. 
पण खरी गम्मत पुढे होती. टि 20 साठी नवीन नियम होते. बाॅल आऊटच्या नियमानुसार सामन्याचा निकाल लागणार होता. 
भारतीय संघाने प्रथम विरेंद्र सेहवाग ला बोलविले. सेहवाग ने कोणतीही चुक न करता त्रिफळा उडविला. त्यानंतर पाकिस्तान च्या यासिर अराफात चा चेंडू स्टंप ला न धडकताच वाया गेला. त्यानंतर हरभजनने सुध्दा त्रिफळा उडविला आणि पाकिस्तानच्या इतर गुल चा चेंडू यष्ट्यांपासुन फुटभर लांबुन गेला. सर्वांना आश्चर्यकारक वाटणारा निर्णय महेंद्र सिंग धोनी ने या वेळी घेतला. फलंदाज राॅबिन ऊथ्थपाला गोलंदाजी साठी पाचारण केले. सर्वांना आश्चर्य वाटले पण ऊथ्थपाने कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत त्रिफळा उडविला आणि सगळ्या प्रेक्षकांना टोपी काढुन अभिवादन केले. आता सामन्याचा निकाल फक्त एक चेंडूनंतर ठरणार होता. अनुभवी शाहिद आफ्रिदी चा चेंडू तर  वाईड टाकल्यासारखा लांबुन गेला. आणि भारतीय संघाला ना भुतो ना भविष्यातो असा थरारक ऐतिहासिक विजय मिळाला. 

आणि येथुनच धोनी पर्वाला सुरवात झाली.

या सामन्याचे हायलाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 
https://youtu.be/FPyLUqVDNLU

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्या स्वप्नातील पुणे शहर...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले माझं पुणे शहर सध्या पोर्शे कार अपघात आणि ३०० शब्दांचा निबंधानी भलतेच चर्चेत आलंय. खरंच अ...